कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताहून १७ किमी दूर हुगली जिल्हा आहे. या जिल्ह्यातील उत्तरपाडा कोननगर इथं रविवारी एका घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. चौथी वर्गात शिकणाऱ्या एका मुलाचा कुणीतरी खून केला होता. ही हत्या एका वजनदार वस्तूने डोक्यात हल्ला करून करण्यात आली होती. त्यासोबत हाताच्या नसा कापल्या होत्या. या दुर्दैवी घटनेने कुटुंबाला धक्का बसला.
हत्येची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाला सुरुवात झाली. परंतु या छोट्या मुलाला कुणी आणि का मारलं असावे हे रहस्य होते. जेव्हा घरात कुणी नव्हते तेव्हा ही हत्या झाली. श्रेयांशुचे आई वडील दोघेही कामाला जातात. घटनेवेळी हे दोघेही बाहेर होते. घरातील इतर सदस्य काही काळ घरात नव्हते. तितक्यात गुन्हेगाराने श्रेयांशुचा जीव घेतला. घटनास्थळी जबरदस्तीने कुणी घरात घुसलंय किंवा दरवाजाची तोडफोड झाली असे काहीही खूणा नाहीत त्यामुळे कुणी ओळखीच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा पोलिसांना अंदाज होता.
श्रेयांशुच्या घरी एक श्वान होता, जो घटनेवेळी शांत होता. हा श्वान कुणी अनोळखी व्यक्ती घरात शिरला की त्याच्यावर भुंकतो. परंतु घरात खून झाला तरी श्वानाचा आवाज आला नव्हता. घरातील सामानही जागच्याजागी होते. पोलिसांचा संशय बळावत जातो. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरतात आणि त्यातून जे सत्य उघड झाले ते धक्कादायक होते. मुलाची आई शांता हिचे तिची मैत्रिण इशरतसोबत समलैंगिक संबंध होते. हे संबंध लग्नापूर्वीपासूनचे होते. याबाबत पतीलाही माहिती होते. परंतु हे कधीही बाहेर आले नाही. परंतु काही दिवसांपूर्वी श्रेयांशुने आईला इशरतसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. मुलगा हे सर्वांना सांगेल या भीतीने महिला त्रस्त होती.
दरम्यान, इज्जत वाचवण्यासाठी इशरत आणि शांताने श्रेयांशुचा खून करण्याचा कट रचला. १८ फेब्रुवारीला या दोघींनी मिळून श्रेयांशुची हत्या केली. त्याच्या डोक्यात हल्ला करत आईनेच मुलाला संपवले. इतक्यावरच न थांबता किचनमधील चाकूने मुलाची नस कापली. पोलिसांनी या प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील फिंगर प्रिंट, हत्येचा हेतू यासह आरोपी शांता शर्मा आणि इशरतला अटक केली. या दोघींना खाकीचा धाक दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला.