मनीषा म्हात्रेमुंबई : माटुंगा येथील गुन्हेगार सिद्धार्थ भोसले उर्फ चॉकलेटच्या अपहरणप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अशातच पसार आरोपींनी आधी एकाची तरी हत्या करू, नंतर पोलिसांसमोर हजर होऊ, असा इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच पोलिसांनी ही अधिक खबरदारी घेत परिसरातील सर्व घडामोडींवर करडी नजर ठेवली आहे. तर या अपहरणप्रकरणी प्रल्हाद पाटकर याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात भोसलेचा मित्र हितेश नागडे या तरुणावर नागेश चव्हाण, विजय काकडे, मंदार रांजणकर, प्रफुुुल्ल पाटकर टोळीने हल्ला चढवला. यामध्ये त्याची ३ बोटे तुटली होती. पाटकर आणि रांजणकर हे नुकतेच जामिनावर बाहेर आले. मात्र, काकडे आणि चव्हाण यांना जामीन मिळत नसल्याने त्यांच्या वादात भर पडली. रविवारी चॉकलेटचे अपहरण करत, त्याला गोडाऊनमध्ये नेत हॉकी स्टिकने जबर मारहाण केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो बचावला. तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चॉकलेटवर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. याच प्रकरणात रांजणकर, तेजस वडेकर उर्फ वड्या, आकाश जामनिक याचा पोलीस शोध घेत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांनी पाटकरकडून पसार आरोपींशी संपर्क साधला असता, हितेश किंवा बंटी या दोघांपैकी एकाची हत्या केल्यानंतरच स्वतःहून पोलिसांकडे हजर होऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. याबाबत माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक चव्हाण यांनी दुजोरा दिला नाही. तसेच, वाहन मालकाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.