वसई : मिरा भाईंदर वसई विरारपोलिस आयुक्तांलय अंतर्गत वसई झोन -३ मधील तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस शिपाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला आहे.
धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीने पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी स्थित आपल्या गावच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे गळफास लावून ही आत्महत्या केली. तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वाल्मिक गजानन आहिरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून या पोलीस तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आल्यानं राज्यातील संपूर्ण पोलीस दलच हादरुन गेलं आहे.
दिपाली बापूराव कदम (२६) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर आरोपी वाल्मिक आहिरे याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलिस तरुणीने आत्महत्येपूर्वी तिने आपल्या भावाला एक पोलीस कर्मचारी सातत्याने त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. व आत्महत्ये पूर्वी चिठ्ठी देखील लिहिली होती अशी माहिती असून ,आता या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
वाल्मिक आहिरे हा वसई विरार पोलीस आयुक्तालंय झोन ३ मधील तुलिंज पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे.तर मृत दीपाली कदम ही वसईत माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होती मात्र तीचे लग्न जमल्यानंतर ती दोन महिन्यांपासून सुट्टीवर होती असे माणिकपूर पोलिसांनी लोकमत ला सांगितलेदरम्यान दिपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 306,504,506 अन्वये यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आता यवत पोलीस व वसई विरार पोलीस आयुक्तांलय या आरोपीविरुद्ध कशाप्रकारे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
आरोपी विवाहित, फोन करुन वारंवार दायचा द्यायचा त्रास
दीपाली ही माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड ते दोन महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता.याखेरीज तिचे लग्न जमल्यानंतर ही सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला तो वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही उडवून लावत दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली.