वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोघांना निर्दोष ठरविण्यात आले तर एकाचा कारागृहातच नैसर्गिक मृत्यू झाला होता. २० आरोपिंना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची ही घटना बहुधा विदभार्तील पहिलीच असू शकते.सोमनाथ नगर (ता. मानोरा जि. वाशिम) येथील देविदास दुधराम चव्हाण यांनी सन २०१२ मध्ये सरपंच मिलींद मधुकर चव्हाण व जनार्दन रामधन राठोड यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल केले होते. परंतू देविदास चव्हाण यांना कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी या दोघांना न विचारता नामनिर्देशपत्र परत घेतले. यामुळे देविदास चव्हाण यांचे सरपंच मिलींद चव्हाण व जनार्दन राठोड यांचेसोबत राजकीय वैमनस्य निर्माण झाले. दरम्यान, १८ मार्च २०१४ रोजी देविदास चव्हाण हे आपला मुलगा अविनाश, मुकेश व पुतण्या गणेश यांचेसोबत मानोरा येथून दुपारी सोमनाथ नगर येथे बंजारा समाजाच्या होळी सनानिमित्त गेले होते. आरोपी सरपंच मिलींद चव्हाण व जनार्दन राठोड हे दोघे देविदास चव्हाण यांच्या घरासमोर डि.जे. वाजवत होते. यावेळी देविदास चव्हाण व त्यांची दोन मुले अविनाश , मुकेश यांनी डि.जे. वाजवण्यास मनाई केली. त्यानंतर डी.जे. बंद करून देविदास चव्हाण यांच्या कुटूंबाला संपविण्याचा कट रचला. दुपारी ४ वाजताचे सुमारास देविदास चव्हाण, अविनाश , मुकेश व पुतण्या गणेश हे चौघे चार चाकी वाहनामध्ये नाईक नगर येथील आपल्या घरासमोर पोहचले. त्याआधिच विरूध्द गटाचे लोक दबा धरून बसले होते. चौघेही कारमधून खाली उतरताच त्यांचेवर हल्ला करून चौघांनाही सुमारे १५० फुटापर्यंत ओढत नेले. त्याठिकाणी आरोपिंनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अविनाश चव्हाण हा जागेवरच ठार झाला. देविदास, मुकेश व गणेश हे तिघे गंभीर जखमी झाले.या घटनेची निर्मलाबाई चव्हाण यांनी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फियार्दीहून सरपंच मिलींद मधुकर चव्हाण , सुदाम उर्फ सुधाकर एस. चव्हाण, जनार्धन रामधन राठोड, दुर्योधन रामधन राठोड, गोवर्धन हरिधन राठोड, ज्ञानेश्वर बब्बूसिंग राठोड, विश्वनाथ फकीरा जाधव, बंडू फकीरा जाधव, किसन गोवर्धन आडे, कोमल बाबुसिंग आडे, कुलदीप रामलाल पवार, अरूण रामलाल पवार, रविंद्र तुळशिराम राठोड, अशोक रामलाल पवार, विनोद हरिधन राठोड, मनोहर तुळशिराम राठोड, दिलीप दलसिंग राठोड, बाबुसिंग रामजी राठोड, सदाशिव लिंबाजी जाधव, रामधन मेरसिंग राठोड, मधुकर भोजू चव्हाण, प्रदिप बाबुलाल जाधव, शिवराम भोजू चव्हाण यांचेविरूध्द भादंवी ३०२, ३०७, १४७, १४८ कलम १३५ मुंबई पो. अ?ॅक्ट , १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.या घटनेचा संपुर्ण तपास करून मानोरा पोलीसांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासले.साक्षीपुराव्यावरून न्यायाधिश पराते यांनी २२ पैकी २० आरोपींना कलम ३०२, १४९ मध्ये जन्मठेप व प्रत्येकी १० हजार दंड ठोठावला. अन्य दोघांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. या संपुर्ण प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून वाशिम येथील उदय देशमुख यांची नेमणूक करण्यात आली होती.