मुंबई - २०१४ साली प्रवीण गुप्ता यांच्या भावाला खोटी माहिती देऊन ५ आरोपींनी राजस्थान येथे बोलविले आणि त्याचे अपहरण केले. अपहृत भावाच्या सुटकेसाठी आरोपींनी पंकज या प्रवीण यांच्या भावाकडे ५ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर गुन्हे शाखा कक्ष ५ ने पाच आरोपींना राजस्थान येथून अटक केली. काल सत्र न्यायालयाने या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जुलै आणि ऑगस्ट २०१४ दरम्यान पंकज गुप्ता यांना हरियाणा येथून राहुलने फोन करून ते कायदेशीररित्या सोन्याची विक्री करत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना सेल्समनची आवश्यकता असल्याचं सांगून हरियाणातील फरिदाबाद येथे भेटण्यासाठी बोलाविले. पंकज यांनी त्यांचा भाऊ प्रवीण गुप्ता यास या कामासाठी फरिदाबाद येथे पाठविले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी प्रवीण यांना डांबून ठेवले आणि पंकज या त्यांच्या भावाकडे प्रवीणला सोडविण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात पंकज यांनी २०१४ साली गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर खंडणीची पैसे देण्यासाठी पंकज यांना राजस्थान येथील कामा येथे आरोपींनी बोलाविले. त्यावेळी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पथकाने सापळा रचून
इरफान हमीद खान उर्फ कुरेशी (४६), इलियास फझर खान (४४), वाहिद ताला जोगी (३०), आझाद मेऊ उर्फ खान (२९) आणि कासम मेऊ उर्फ खान (२९) या ५ आरोपींना रंगेहाथ अटक केली. अपहृत प्रवीण गुप्ता यांची सुखरूप सुटका करण्यात आली. अटक केल्यानंतर आतापर्यंत सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना सत्र न्यायालयाने सर्व साक्षीदार, तांत्रिक, परिस्थितीजन्य आणि कागदोपत्री पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज हा निकाल सत्र न्यायायालयाने दिला आहे. या ५ आरोपींना दोषी ठरवून भा. दं. वि. कलम ३८७ श १२० - ब अन्वये ५ वर्ष शिक्षा आणि २ हजार रुपये दंड तर कलम ३४२ सह १२० - ब अन्वये १ वर्ष शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आणि कलम १२० - ब अन्वये सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.