मडगाव- झारखंड राज्यातील एका युवकाच्या खून प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविताना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निवाडा दिला. न्यायाधीक्ष एडगर फर्नाडीस यांनी आज मंगळवारी आरोपी दुलार मुंडा (47) याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये दोषी ठरविताना वरील शिक्षा फर्माविली. एक वर्षापूर्वी दक्षिण गोव्यातील वाडी - बाणावली येथे खुनाची ही घटना घडली होती. मूळ झारखंड येथील सचिन ओरांव या अठठावीस वर्षीय युवकाचा त्याचाच सहकारी दुलार याने दंडुक्याने मारहाण करुन त्याचा खून केला होता.
सरकारपक्षातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या खून खटल्याची बाजू मांडताना एकूण 14 साक्षिदार तपासले होते. आरोपीला जन्मठेपेशिवाय दहा हजार रुपये दंड व तो न भरल्यास तीन महिन्याची साध्या कैदेची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे.
12 फेब्रुवारी 2017 साली रात्री आठच्या दरम्यान खुनाची ही घटना घडली होती. आरोपी दुलार मुंडा हा ही झारखंड राज्यातील असून, ते दोघेही वाडी - बाणावली येथील समुद्र किना:यावर असलेल्या पेद्रो बारमध्ये वेटर म्हणून कामाला होते. खुनाच्या घटनेच्या दिवशी रात्री मयत सचिन ओरांव याने पेद्रो बारमधील विनयकुमार सिंग व तिलकराज या दोन कामगारांना बेदम मारहाण केली होती. नंतर तो पळून गेला होता. दुलार मुंडा याने सचिनला या मारहाणीबददल जाब विचारला होता. नंतर दोघांमध्ये बाचाबाची होउन रागाच्या भरात दुलारने सचिनवर दुंडक्याने प्रहार केला होता. यात तो जागीच मरण पावला होता. मागाहून कोलवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुलार याला ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली होती. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी संशयितावर आरोपपत्र दाखल केले होते.
सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या खटल्यात प्रभावी युक्तीवाद करताना संशयितांविरुध्द अनेक परिस्थितीजन्य पुरावे समोर आले असून, मयत सचिन ओरांव याला मारहाण करण्यासाठी वापरलेल्या दंडुक्यावर मानवी रक्ताचे अंश सापडले होते,पेद्रो बारच्या कामगारांना मारहाण करुन सचिन ओरांव व दुलार मुंडा हे पळून गेले होते असे न्यायालयात पुराव्यानिशी सिध्द केले होते.या मारहाणीनंतर दुलार मुंडा याने सचिनला दंडुक्याने मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला होता. खास न्यायदंडाधिकारी सरोजिनी सार्दीन यांनी आरोपीचा जबाब घेतला होता. त्यात त्याने गुन्हयाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सचिन ओरांवने कामगारांना मारहाण केल्याने चिडून आपण त्याला मारहाण केली असता, त्याला मृत्यू आल्याचे सांगून, खूनाच्या गुन्हयाबददल आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठाविण्याची मागणी सरकारी वकील सुभाष देसाई यांनी केली होती.
सरकारपक्षाने दाखल केलेल्या पुराव्यात अनेक त्रुटी असून, आरोपीने सचिन ओरांवचा खून केला याबददल ठोस पुरावे सादर न केल्याने आपल्या अशिलाची सुटका करावी अशी मागणी संशयिताच्या वकिलाने आपल्या युक्तीवादात केली होती.
20 फेब्रुवारी रोजी वाडी - बाणावली येथे एका शेतात मानवी हाडाचा सापळा सापडला होता. डीएनए चाचणीत तो सापळा सचिनचा असल्याचे स्पष्ट झाले होते. कोलवा पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करुन संशयिताला अटक केली होती. या खून खटल्यात एकूण41 मुददेमाल जप्त केले होते. या खटल्यात गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाचे डॉ. सुनील चिंबलकर यांनी आपल्या साक्षीत कोलवा पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार आपण एका पंचवीस ते तीस वर्षीय मृतदेहाची शवचिकित्सा केली होती. मयताच्या डोक्यावर अवजड वस्तुने प्रहार झाल्याने मेंदुची कवटी फुटून त्याचा मृत्यू झाल्याचे आपणाला आढळून आल्याची साक्ष न्यायायलात दिली होती.