पुणे: पूर्ववैमनस्यातून चाकुने वार करत मित्राचा खून करून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए.एस.भैसारे यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. किशोर प्रकाश शिंदे (रा. वडगावशेरी, मूळ. डाळज, भिगवण, जि. पुणे, वय 27) आणि भक्त दुर्गाचरण त्रिपाठी (वय 41, रा. रामवाडी, मूळ. ओरीसा) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. मयुर ऊर्फ बंटी ज्ञानेश्वर घोलप (वय 33, रा. आझाद चौक, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचे वडील ज्ञानेश्वर महादेव घोलप (वय 64) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 10 जुलै 2014 रोजी पहाटे 5.15 च्या सुमारास फिर्यादीच्या घरात घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी 20 साक्षीदार तपासले. शिंदे, त्रिपाटी आणि मयुर हे तिघे मित्र होते. त्यांना दारूचे व्यसन होते. मयुर याने पूर्वी दोघांना मारहाण आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर 9 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता त्यांचा आणखी एका मित्र त्रिपाठीकडून पत्ते घेऊन मयुर याच्याबरोबर खेळत होता. पत्ते खेळून झाल्यावर त्रिपाठी याने भाडे 10 रुपये मागितले. त्यावेळी मयुर याने 10 रुपये दिले. भांडण करून पुन्हा पैसे माघारी घेतले. या कारणावरून त्रिपाठी आणि शिंदे चिडले होते. घटनेच्या दिवशी ते मयुर याच्या घरी मुक्कामाला गेले. पहाटे तो झोपेत असताना शिंदे यांनी गळ्याचे कंठामध्ये चाकु खुपसला. तर, त्रिपाठी याने त्याचेकडील चाकुने छातीवर, पोटावर, उजवे पायाचे नडगीवर, डावे पायाचे मांडीवर आणि पाठीवर वार करून त्याचा खून केला. त्याची दुचाकी, मोबाइल घेऊन दोघे औरंगाबादला फरार झाले होते. शिंदे याने त्यच्याकडील चाकुचे तुटलेली मुठ मुळा नदीच्या पात्रात टाकून, त्रिपाठी याने चाकु रामवाडी येथे टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोघांना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अॅड. जावेद खान यांनी केली.
मित्राचा खून करुन पुरावा नष्ट करणा-या दोघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 3:53 PM
पूर्ववैमनस्यातून चाकुने वार करत मित्राचा खून करून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना जन्मठेप शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देसाडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा : दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास