देवेंद्र पाठक, धुळे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप व दहा हजार रुपयांची शिक्षा ठोठावण्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे.जे. बेग यांनी आज दिला. गोरख एकनाथ चव्हाण (वय ४८) असे जन्मठेप ठोठावलेल्या पतीचे नाव आहे.
भारतीबाई गोरख चव्हाण हिचा पती गोरख एकनाथ चव्हाण हा काहीही काम करत नव्हता. त्यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो पत्नी भारतीबाई हिला शिवीगाळ करत मारहाण करायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या छळास कंटाळून भारतीबाईचे मामा सुकदेव काळू गायकवाड यांनी तिला तिच्या मुलांसह साक्री तालुक्यातील कोकणगाव येथे घेऊन आले होते. २१ जून २०१९ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भारतीबाई ही घराजवळ कपडे धूत होती. तेथेच गोरख चव्हाण याने मागून येऊन हातातील मोठा दगड भारतीबाईंच्या डोक्यात टाकून तिचा निर्घृण खून केला. याप्रकरणी सुकदेव काळू गायकवाड यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२ अन्वये पती गोरख चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या घटनेचा तपास तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी केला. संशयित गोरख चव्हाण याच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ३ यांच्या न्यायालयासमोर कामकाज चालले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. पराग पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी गोरख एकनाथ चव्हाण (वय ४८) याला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड व तो न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार हरीश गढरी यांचे सहकार्य लाभले.