- मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने गळा कापून खून करणाऱ्या पतीस नंदुरबार न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. २२ जून २०२२ रोजी ही घटना नंदुरबारातील सरोजनगर भागात घडली होती. या खटल्याची हकीकत अशी : सरोजनगर भागातील प्लॉट नंबर ३० मध्ये अरुण सुकलाल नामदास व त्याची पत्नी रेखा नामदास हे राहत होते. अरुण हा नेहमीच पत्नी रेखावर चारित्र्याचा संशय घेत होता. २२ जून २०२२ रोजी सकाळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. रागाच्या भरात त्याने स्वयंपाक घरातील चाकूने पत्नी रेखा हिचा गळा चिरून खून केला. याबाबत अशोक देवराम खांडेकर यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिसांनी लागलीच अरुण नामदास (३६) यास अटक केली.
पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी विपुल पाटील यांनी गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. अरुण नामदास विरुद्ध दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. नातू यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तिवाद या सर्व बाबींचा विचार करून आरोपी अरुण सुकलाल नामदास यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. विजय चव्हाण यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, हवालदार नितीन साबळे, गिरीष पाटील यांनी कामकाज केले.