ठाणे : नाश्ता बनविला नाही या अगदी क्षुल्लक कारणावरुन शोभा गणेश कुलकर्णी (७५) या वयोवृद्ध मावशीवर चाकूने डोक्यावर आणि डोळयावर वार करुन तिचा खून करणाऱ्या स्वप्ना सुधीर कुलकर्णी (३९, रा. खोपट, ठाणे) हिला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांनी सुनावली आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्ष सक्त मजूरीची अतिरिक्त शिक्षाही सुनावली आहे.
केवळ नाश्ता न बनविल्याच्या कारणावरुन प्रताप सिनेमा जवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या स्वप्ना आणि तिची मावशी शोभा यांच्यात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जोरदार वादावादी झाली होती. याच भांडणामध्ये रागाच्या भरात स्वप्ना हिने तिची मावशी शोभा हिच्या डोक्यावर आणि डाव्या डोळयावर किचनमधील चाकूने वार करुन तिचा खून केला. भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून आरोपी स्वप्ना हिने स्वत:च्या अंगावरील कपडेही वॉशिंग मशिनमध्ये धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
चौकशीसाठी आलेल्या राबोडी पोलिसांना मात्र मावशी पलंगावरुन पडल्यामुळे मृत पावल्याचे कारण सांगितले. दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षम राम सोमवंशी, पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे आणि उपनिरीक्षक हर्षलकुमार गावीत यांना या वृद्धेच्या डोक्यावर जखमा आढळल्या. तसेच घरातील भिंतीवरही रक्ताचे डाग आढळले. त्याचवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात ७ ऑक्टोबर २०१८ रोजी शवविच्छेदन झाले. या अहवालातही तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखन करुन पोलिसांनी स्वप्ना कुलकर्णीला अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांच्या न्यायालयात शुक्रवारी (२२ मे २०२२ ) झाली. यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे तपासले. यात प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर न्या. ताम्हणकर यांनी आरोपी स्वप्ना हिला खूनासाठी जन्मठेप तसेच दहा हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कैैदेची शिक्षा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे.