फाशीऐवजी जन्मठेप! बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाची फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:20 IST2022-02-09T21:19:31+5:302022-02-09T21:20:48+5:30
Life imprisonment instead of hanging : आरोपीने मित्रासमोर दिलेली घटनेची कबुली व इतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले.

फाशीऐवजी जन्मठेप! बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाची फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई : ठाणे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चौहान यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मोहम्मद आबेद मोहम्मद अजमेर शेख, असे आरोपीचे नाव आहे. भिवंडी येथील भोईवाडा येथे १ एप्रिल २०१८ रोजी ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी खेळण्यासाठी गेली व ती घरी परतलीच नाही. अखेर दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पोलिसांत याची तक्रार दिली. ४ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.
मात्र आरोपी फरार होते. त्याने फरार होण्याआधी मित्राला घटनेबाबत सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश येथून अटक केली. आरोपीने मित्रासमोर दिलेली घटनेची कबुली व इतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. ते ग्राह्य धरत सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारी पक्षाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. न्यायालयाने हे प्रकरण विरळातील विरळ नसल्याचा निष्कर्ष नोंदवला.
मेणबत्तीला ठेचले : प्रकाशमान होण्याआधीच थडग्याच्या दगडाने मेणबत्तीला ठेचले, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने यावेळी नोंदवले. कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहावरही न्यायालयाने दु:ख व्यक्त केले. आईवडील हे लाडाने मुलीचे संगाेपन करतात. अशा वेळी कुजलेला मृतदेह बघायला मिळणे यासारखे दुसरे दु:ख नाही, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.