नागपूर : अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी पतीचा निर्घृण खून करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह एकूण चार आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. आराेपींमध्ये मोनिका मनोज भाबट (नागपूर), प्रमोद माधव रन्नावरे (वडगाव, जि.यवतमाळ), नितीन मधुकर घाडगे (वडगाव, जि.यवतमाळ) व आशिष रामदास कठाळे (काळगाव, जि.यवतमाळ) यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत मनोज भाबट यांच्याशी २००० मध्ये मोनिकाचे लग्न झाले होते. त्यानंतर, त्यांना एक मुलगा झाला. मनोज कर्तव्यावर असताना, पत्नी मोनिका ही यवतमाळ येथेच राहात होती. दरम्यान, मोनिकाचा आरोपी प्रमोदवर जीव जडला. ही गोष्ट मनोजला समजल्याने मनोज व मोनिकाचे भांडण होऊ लागले. मनोजचा अडसर दूर करण्यासाठी मोनिका व प्रमोदने कट रचून इतर दोन आरोपींच्या मदतीने दि. १ ऑक्टोबर, २०१३ रोजी चाकूने भोसकून मनोजचा खून केला.
अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीची जन्मठेप कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:11 AM