- अशोक बिदरी
मनमाड ( नाशिक ) : रेल्वे स्थानक परिसरात आणि धावत्या रेल्वेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तंबाखू, सिगरेट, मद्य आणि ज्वलंतशील पदार्थांसाठी बंदी आहे.मात्र भुसावळ विभागात दोन दिवसीय तपासणी मोहिम भुसावळ विभागातील, नाशिक मनमाड,भुसावळ,खंडवा आणि बडनेरा राबवली जात आहे. दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील खाद्य पेय स्टॉल मध्येच दारू,सिगरेट आणि गुटखा मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रवासी वर्गात चर्चेला उधाण आले आहे. स्वच्छता पंधरवडा आणि आहार दिनानिमित्त दोन दिवसीय तपासणी मोहीम भुसावळ विभागातील विविध स्थानकात व धावत्या रेल्वेमध्ये राबवली जात असतानाच भुसावळ स्थानकातील फलट क्रमांक एक व दोन वर असलेल्या दिपाली चौधरी यांच्या मालकीचे खाद्य पेय विक्री स्टॉलमध्ये विदेशी दारूच्या ८ बाटल्या, देशी दारूच्या १० बाटल्या, ६ पाकिटे विमल गुटखा, सिगरेट व बिडी पाकीट तपासणी दरम्यान आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. भुसावळ विभागाचे वाणिज्य प्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे,कमर्शियल इन्स्पेक्टर नितीन राठोड, कमर्शियल डीआय स्टेशन मॅनेजर मिलिंद साळुंखे, तिकीट निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.