उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या नजरेपासून वाचून दारूची तस्करी करणारे नको नको ते मार्ग निवडत आहेत. जेणेकरून निवडणुकीचा फायदा घेत जास्त पैसे कमावता येतील. अशीच एक दारू तस्करीची घटना समोर आली आहे. या तस्करांनी नुकताच रिलीज झालेल्या 'पुष्पा' सिनेमा स्टाइलने तस्करी (Pushpa Style Liquor Smuggling) करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी टॅंकर आतून दोन भागात विभागलं. एका भागात केमिकल आणि दुसऱ्या भागात दारूच्या पेट्या ठेवल्या होत्या.
टॅंकरमध्ये सापडल्या ३६० दारूच्या पेट्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना पूर्वांचल राज्यात टॅंकरमधून दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. टॅंकर आयएसबीटी आणि ट्रान्सपोर्ट नगरच्या आसपास असल्याची माहिती मिळाल्यावर शोध सुरू करण्यात आला. तस्करीचा प्रकार समोर येताच पोलिसांनी टॅंकरच्या चालकासहीत इतर आरोपींना अटक केली.
मुख्य आरोपींचा शोध सुरू
पोलिसांच्या चौकशी दरम्यान दोघांनी सांगितलं की, ते हे सगळं राजवीर आणि अनिल शर्मा नावाच्या व्यक्तीसाठी करतात. आधी तर ड्रायव्हर नेपाल सिंह म्हणाला की, त्याला माहीतच नव्हतं की, टॅंकरमध्ये काय आहे. त्याचा साथीदार कुलदीप म्हणाला की, टॅंकरमध्ये केमिकल भरलेलं आहे. त्याने पोलिसांना एक बिल दाखवलं जे सीमेंट हार्डनर केमिकलच्या नावाने बनवलं होतं. त्यानंतर टॅंकरची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यात तीन कम्पार्टमेंट दिसले. एका भागात केमिकल होतं, इतर दोन भागात दारूचे बॉक्स होते.
पुष्पा पाहून आली आयडिया
चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलं की, पुष्पा सिनेमा पाहून त्यांना टॅंकरमधून दारूची तस्करी करण्याची आयडिया आली. दारू त्यांनी हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातून आणली होती. यावेळी ३६० पेट्या दारू, देशी दारूचे काही रॅपर, ७२ बारकोड सहीत काही साहित्य सापडलं. पोलीस मुख्य आरोपींचा शोध घेत आहेत.