नवी मुंबई - घणसोली सेक्टर 5 येथील दारूच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. त्यामध्ये सुमारे 30 हजार रुपये किमतीची दारू चोरीला गेली आहे.गुरुवारी पहाटेच्या सुमारास घणसोली सेक्टर 5 येथील वर्षा वाईन शॉप मध्ये हा प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी शॉपच्या शटरचा टाळे तोडलेले असल्याचे परिसरातील काही व्यक्तींनी पाहिले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता शटर उचकटून घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. मागील दोन महिने लॉकडाऊन मुळे तळीरामांची गैरसोय झाली आहे. तर तीन दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागातली मद्यविक्री केंद्र सुरु झाली असता, नवी मुंबईत मात्र बंदच ठेवण्यात आली होती. तरीही तळीरामांकडून मद्यविक्री केंद्राबाहेर दोन दिवस फेरफटका मारून आढावा घेण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे मद्यविक्री केंद्र खुली होत नसल्याने चक्क घरफोडी करून दारू चोरल्याचा प्रकार घडला आहे. त्यामध्ये सुमारे 30 हजार रुपयांची दारू चोरल्या प्रकरणी कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत.
विरह सहन होईना! घणसोलीत पहाटे पहाटे दारूचे दुकान फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 21:40 IST