नालासोपारा / नवी दिल्ली : २७ वर्षांची तरुणी एका मुलाला भेटते, प्रेमात पडते आणि नंतर तिच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते. सगळे काही बॉलिवूड चित्रपटातील कथेसारखे वाटेल. परंतु या कथेचा अंगावर शहारे आणणारा भयानक शेवट झाला, लिव्ह-इन-पार्टनरने वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. तिच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी १८ रात्री दिल्लीत फिरत होता !हत्येच्या पाच महिन्यांनंतर सर्व घटनेचा उलगडा झाला. दिल्लीतील आफताब अमीन पुनावाला याने १८ मे रोजी त्याची लिव्ह-इन-पार्टनर मूळची वसईच्या माणिकपूर भागातील श्रद्धा वालकर (२७) हिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो घरात अगरबत्ती लावायचा. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने फ्रीज विकत घेतला. पुढील १८ दिवसांमध्ये, दिल्लीच्या आसपासच्या विविध ठिकाणी तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तो पहाटे २ वाजता घर सोडायचा. आफताबचे इन्स्टाग्रामवर २८ हजार फॉलोअर्स आहेत.
वसईच्या विजय विहार काॅम्प्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) हिचे मूळ दिल्लीचा रहिवासी असलेल्या आफताब अमिन पुनावाला याच्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मालाडला दोघे एका कॉल सेंटरमध्ये कामाला होते. तेथेच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र दुसऱ्या धर्मातील तरुणाशी विवाह करण्यास श्रद्धाच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे तिच्या घरात भांडणे झाली होती. श्रद्धाच्या वडिलांनी तिच्याशी बोलणे सोडले होते. मात्र, प्रेमात आकंठ बुडालेले दोघेही दुसरीकडे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते.
अमेरिकी क्राइम शो पाहून रचला कट...सतत लग्नाचा तगादा लावल्याने वैतागलेल्या आफताबने श्रद्धाचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने ‘बेक्स्टर’या अमेरिकी क्राइम शोची मदत घेतली. या शोपासून ‘प्रेरित’ होऊन आफताबने हे अमानुष हत्याकांड घडवून आणले, असे पोलिसांनी सांगितले.
का केली हत्या?श्रद्धा लग्नासाठी आफताबच्या मागे लागली होती, परंतु आफताबचे इतर अनेक मुलींसोबतही संबंध होते आणि श्रद्धाला त्याच्यावर संशय येत होता. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. आफताबने वैतागून तिची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
आफताब फूड ब्लॉगरआफताब अमीन हा फूड ब्लॉगर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे वैयक्तिक ‘द हंग्री छोकरो’ हे खाते आहे, तेथे त्याचे २८ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अशाच नावाचा त्याचा ब्लॉगही आहे. त्याच्या वैयक्तिक ब्लॉगवर, त्याने ३ मार्च, २०१९ रोजी शेवटचा फोटो पोस्ट केला होता.
तक्रारीनंतर तपास- श्रद्धा हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला तपासाला सुरुवात केली. - याप्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप हे पथकासह चौकशी व तपासाला लागले होते. - आफताब आणि श्रद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक दिल्लीला गेले होते. पथकाने दिल्ली पोलिसांची मदत घेत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. - दरम्यान, श्रद्धाचे वडील हे सध्या दिल्लीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
क्रौर्याचा कळसलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांमध्ये कालांतराने भांडणे होऊ लागली होती. लग्न करण्यासाठी मागे लागलेल्या श्रद्धा हिची आफताब याने १८ मे रोजी गळा आवळून हत्या केली.आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले. अधूनमधून तो एकेक तुकडा पिशवीत ठेवायचा आणि दिल्लीजवळील मेहरौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा.
२०१९मध्ये या दोघांची ओळख झाली होती. श्रद्धाच्या वडिलांना ही बाब माहीत झाल्यावर त्यांनी तिच्यासोबत बोलणे सोडले होते. दिल्लीतही हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना मिळाले आहेत.- सचिन सानप, सहायक पोलिस निरीक्षक, माणिकपूर पोलिस ठाणे