मुंबई : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पार्टनरच्या चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण करत तिची तामिळनाडूत पाच लाखांना विक्री करण्याची संतापजनक घटना व्ही. पी. रोड पोलिसांच्या हद्दीत घडली. याप्रकरणी चार दिवस तपास करत एका टोळक्याला अटक करण्यात आल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. या टोळीत अपहृत बाळाच्या आईच्या मित्रासह एकूण ११ जणांचा समावेश आहे.
जानेवारी ३ रोजी बाळाची केअर टेकर अन्वरी शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन इब्राहिम शेख (३२) याने त्यांच्याकडून बाळाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले व विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती करत तपासाला सुरुवात करण्यात आली. या पथकाने आधी इब्राहिमला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी करत मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, सायन, कल्याण, धारावी व ठाण्यात छापे टाकत २ महिला व ४ पुरुषांना ताब्यात घेतले.
बाळाला कर्नाटक, तामिळनाडूमध्ये विकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप तांबे व अभिजित देशमुख यांचे पथक दोन्ही ठिकाणी रवाना झाले. तांबे यांनी सतत चार दिवस सतत माग घेत तामिळनाडूच्या कोईमतूरमधुन कायदेशीररीत्या ताब्यात घेतले तसेच एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.
कथित बापाची होणार ‘डीएनए’ चाचणी
बाळाची आई ही कामानिमित्त १ डिसेंबर, २०२१ पासून बाहेर गेली असून ती परतली नाही. इब्राहिम हा तिचा लिव्ह इन पार्टनर असून स्वतःला बाळाचा बाप म्हणवत आहे. त्यामुळे त्याची बाळासोबत डीएनए चाचणी करण्याची तयारी पोलीस करत असून सध्या तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करून त्यांच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.