मुंबई : नागपाड्यातील तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून विविध फायनान्स कंपन्यांकडून ३३ लाख ८७ हजार ९७ रुपयांचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपाडा येथील बेलासीस रोड परिसरात मोहम्मद वाफी फकरे आलम अन्सारी (३०) राहतात. मंगळवारी आलेल्या विविध भ्रमणध्वनींमुळे त्यांना धक्का बसला. कुठल्याही बँकेतून कर्ज घेतले नसताना, त्यांच्या नावावर ३३ लाख ८७ हजार ९७ रुपयांचे कर्ज घेतल्याचे दिसून आले.
काही ठगांनी कागदपत्रांचा वापर करीत सप्टेंबर २०१७ ते ४ जून २०१९ दरम्यान विविध फायनान्स कंपन्यांसह २ बँकांमधून हे कर्ज घेतले आहे. त्यांनी याबाबत नागपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नागपाडा पोलीस संबंधित टोळीचा शोध घेत आहेत. मुंबईत आणखी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? याचा तपासही पोलीस करीत आहेत.
कागदपत्रे देताना जरा जपूनकोणालाही कागदपत्रे देण्यापूर्वी त्यांचा गैरवापर होणार नाही, याची खातरजमा करा. संशय आल्यास त्याबाबत पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.