मुंबई: ट्रेनमध्ये दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फटका गँगने मोबाईल चोरल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता प्रवाशांप्रमाणेच लोकलमधल्या गार्डचा मोबाईल फटका गँगने चोरल्याची घटना शनिवारी घडली आहे. तसेच या घटनेनंतर लोकच्या गार्डसह ट्रेनमधील प्रवाशांना देखील फटका सहन करावा लागला आहे.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी स्थानकातून अंधेरीला जाणाऱ्या लोकलमधील गार्ड सत्येंद्रकुमार महातो यांच्या हातावर मारुन फटका गँगने मोबाईल चोरल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर गार्डने ट्रेनचा आपातकालीन ब्रेक दाबून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल चोर समोरच असणाऱ्या झोपडपट्टीत शिरल्याने सत्येंद्रकुमारांना त्याला पकडण्यात अपयश आले. या सर्व प्रकरणानंतर सत्येंद्रकुमारांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सीएसएमटी स्थानकावरुन अंधेरीला जाणारी ही लोकल 7 वाजून 41 मिनिटांनी सुटत असून माहीम स्थानकात ८ वाजून ११ मिनिटांनी पोहचली होती. माहीम स्थानकावरुन लोकल सुटल्यानंतर चोरट्याने लोकलचे गार्ड सत्येंद्रकुमार महातोंच्या हातावर फटका मारुन मोबाईल चोरुन पळ काढला, त्यानंतर सत्येंद्रकुमार यांनी चोराचा पाठलाग करण्यासाठी आपातकालिन ब्रेक दाबून लोकल थांबवली होती. तसेच हा सर्व प्रकार सुरु असताना ट्रेन माहीम स्थानकावर तब्बल 17 मिनिटे उभी असल्याने या फटका गँगचा फटका गार्डसह प्रवाशांना देखील करावा लागला.