फरीदाबाद : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दारुची दुकाने बंद आहेत. तरीही कुठे ना कुठे चोरून दारुची विक्री केली जात आहे. यातून अपघातही घडू लागल्याने पोलखोल होऊ लागली आहे. असाच एक प्रकार फरीदाबादमध्ये घडला आहे. दारुचया नशेमध्ये असेलेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तो एका घराची भिंत तोडून बेडरूममध्ये घुसला. या अपघातामध्ये कोणाचा मृत्यू झाला नसला तरीही तो घरमालक मात्र प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरीदाबादच्या सेक्टर ८ मध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. घर मालक प्रेम दत्त कथुरिया हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले होते. मध्यरात्री गाढ झोपेत असताना त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. डोळे उघडत नाहीत तोच एक कार बेडरुमची भींत फोडून आतमध्ये घुसली होती. या कारचा वेग एवढा होता की कंपाऊंडमध्ये अललेल्या बाईकचाही चुराडा झाला. ही कार दिपांशू नावाचा व्यक्ती चालवत होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेमुळे घर मालक कथुरिया यांचे कुटुंबीय एवढ्या मोठ्या दहशतीखाली होते की त्यांना रात्रीची झोपच लागली नाही. सारखी ही घटना डोळ्यासमोर येते. त्याचबरोबर त्यांना प्रश्न पडलाय की, लॉकडाऊन असताना या तरुणाला दारु मिळालीच कशी? अपघाताची सूचना मिळताच फरीदाबाद पोलिसांनी घटनास्थळावरून कारचालकाला ताब्यात घेतले आहे. तो शुद्धीत आल्यावर त्याची चौकशी करण्यात आली आहे.