नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातावरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि कमाईच साधन नसल्याने जमा केलेले पैसे संपले त्यामुळे एका व्यक्तीला पत्नी आणि मेव्हण्याने बेदम मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत पतीचं डोकं फुटलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या छपरा शहरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये पतीच्या कमाईचं साधन बंद झाल्याने पत्नी नाराज झाली होती. रागाच्या भरात पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने पतीला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये पती गंभीररित्या जखमी झाला असून त्याला त्याच्या भाच्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पतीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने उत्पन्नाचं काही साधन नाही. आधी जमा केलेले पैसे देखील संपले आहेत. चपलांच्या दुकानात आधी काम करत होतो. पण आता तिथली देखील नोकरी गेली आहे.
पत्नी वारंवार पैसे मागते. मात्र कामच नसल्याने तिला पैसे देऊ शकत नाही. म्हणूनच तिने आपल्या भावाला बोलावून घेतलं आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती पतीने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. संपत्तीवरून अनेकदा कुटुंबीयांमध्ये वादविवाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक भयंकर घटना पाकिस्तानच्या पेशावरमध्ये घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
भयंकर! बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितल्याने भावांकडून हातोडा, हेल्मेटने बेदम मारहाण; Video व्हायरल
अब्दुल हन्नान या व्यक्तिच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. दोन्ही मुले आफताब आणि अर्षद यांनी आपल्या बहिणीला बेदम मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही भावांनी बहिणीला हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बहीण पडल्यानंतरही ते दोघे तिला मारहाण करत होते. घरातील एक वृद्ध महिला तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही धक्काबुक्की करण्यात येते. ही वृद्ध महिला त्यांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी पेशावरमधील या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडे आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. बहिणीने संपत्तीत वाटा मागितल्याने मारहाण केली असल्याचे आरोपींनी म्हटले आहे.