लखनऊ – सध्या कोरोना संकट काळात या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. लखनऊ येथे सकाळी सकाळी एका पार्कमध्ये भूताचा फेस मास्क घालून टिकटॉक व्हिडीओ करणं चार तरुणांना महागात पडलं, पोलिसांनी या चार जणांना अटक केली आहे.
हे चार मित्र भूताचा मास्क घालून पार्कमध्ये व्हिडीओ शूट करत होते, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पोलिसांना याबाबत सूचना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या चार जणांना ताब्यात घेतलं. यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. वादग्रस्त टिकटॉक व्हिडीओ शूट करण्याच्या नादात तरुणाई अनेकदा नियमांचे उल्लंघन करते ते त्यांच्या अंगलट येत असल्याचं दिसून येतं.
पोलीस निरीक्षक आशियाना संजय राय यांनी सांगितले की, शारदानगरच्या रजनीखंडमध्ये राहणारे मोनू यादव आणि सोनू यादव हे दोन भाऊ आहेत, त्यांना टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा नाद आहे. ते नेहमी नवनवीन व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात. पहाटे ५ वाजता ते अनूप आणि अमित या मित्रांसोबत टिकटॉक व्हिडीओ बनवण्यासाठी एका पार्कमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी हॉरर मास्क घालून एकमेकांना घाबरवण्याचे व्हिडिओ केले. त्यानंतर त्यांनी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांना घाबरवत व्हिडीओ बनवले, हॉरर मास्क घालून अचानक समोर आल्याने अनेकजण भयभीत झाले.
एका स्थानिक वृद्ध दाम्प्त्यालाही या तरुणांनी अशाच प्रकारे घाबरवले, त्यामुळे त्यांच्या ह्दयाचे ठोके वाढले, हे तरुणांनी तिथून पळ काढल्यानंतर इतर लोकांनी या दाम्प्त्यांना सांभाळले, त्यानंतर काहींनी याबाबत सत्यता सांगितली, या दाम्प्त्यांनी तरुणांविरोधात पोलीस तक्रार केली. पोलिसांनी त्यानंतर या चार जणांना ताब्यात घेतले. आपण केलेल्या कृत्याचा तरुणांना पश्चाताप झाला, यापुढे आम्ही व्हिडीओ बनवणार नाही अशी विनवणी त्यांनी पोलिसांना केली, पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.