गेल्या आठवडाभरापासून मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. लोकायुक्त छाप्यातील मुख्य आरोपी माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा कुठे आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आता सौरभ शर्माच्या नावाने समन्स जारी करण्यात आला आहे.
लोकायुक्त डीजी जयदीप प्रसाद यांनी सांगितलं की, सौरभ शर्मा, चेतन गौर यांच्यासह शरद जयस्वाल नावाच्या व्यक्तीला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. कारण छाप्यांमध्ये त्यांच्या नावावर असलेल्या काही मालमत्तेची कागदपत्रंही सापडली आहेत. सौरभच्या ठावठिकाणाबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही, त्यामुळे त्याला समन्स बजावण्यात आला आहे. सौरभ देशात किंवा परदेशात कुठेही असला तरी त्याला येथे आणलं जाईल.
जयदीप प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ शर्माचा हवाला नेटवर्कशी संबंध असण्याची शक्यता असल्याने या पैलूचाही तपास केला जात आहे, मात्र आतापर्यंतच्या तपासात हवाला नेटवर्कचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.
लोकायुक्तांच्या छाप्यात प्रत्यक्षात अनेक प्रकारची कागदपत्रं आणि डायरीही जप्त करण्यात आली असून त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांची नावं असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात सौरभ शर्माचा कोणत्याही राजकारण्याशी थेट संबंध नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभच्या डायरीमध्ये डिसेंबर २०२४ पर्यंत ९७ कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. सध्या सर्व कागदपत्रं आणि डायरी सील आहे, परंतु डीजी लोकायुक्तांनी डीएसपी वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टीम तयार केली आहे, जी या प्रकरणाची चौकशी करेल.
डायरीत कोट्यवधींच्या व्यवहारांची नोंद असेल, तर हा पैसा कुठून आला आणि हा पैसा कोणाकडे जाणार होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न टीम करणार आहे. या खुलाशावर सध्या तपासाची दिशा अवलंबून आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.