मुंबई: आजीचा वाढदिवस नातेवाईकांसह लोणावळ्यामध्ये साजरा करायचा म्हणून एका ३८ वर्षीय महिला बँकरने इंस्टाग्रामवर जाहिरात पाहत बंगला बुक केला. मात्र सदर खाते फेक असल्याचे उघडकीस आले आणि यात त्यांना हजारो रुपयांचा फटका बसला. या विरोधात त्यांनी वकोला पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार या एका नामांकित बँकेत कार्यरत असून त्यांचे पती हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत. आजीचा वाढदिवस लोणावळ्यात नातेवाईकांसह साजरा करण्यासाठी ३८ वर्षीय महिला बँकरने इंस्टाग्रामवर १४ ऑगस्ट रोजी भटनागर डॉट मनू या आयडीवर सर्च केले. तेव्हा लोणावळ्यातील स्टे व्हीस्टा अरिहंता नावाचा बंगला त्यांना आवडला. त्यामुळे त्यांनी सदर हँडलवर मेसेज करत १६ जणांसाठी २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्टपर्यंत बुकिंग बाबत चौकशी केली आणि बँकरला एक मोबाईल क्रमांक पाठवत त्यावर मेसेज करायला सांगण्यात आले. नंतर बंगल्याची सर्व माहिती त्यांना देण्यात आली. हा बंगला पसंत आल्याने त्याचे दोन दिवसाचे भाडे ९० हजार रुपये असून त्यातील अर्धी रक्कम तक्रारदाराला भामट्याने पाठवायला सांगितली. मात्र त्यांनी ते पैसे न पाठवल्याने त्यांना समोरून कॉल करत बुकिंग न केल्यास हा बंगला दुसऱ्याला देण्यात येईल असे सांगण्यात आले.
आधी एक हजार आणि नंतर ४४ हजार त्यांनी पाठवले. पैसे मिळाल्याचा मेल त्यांना आरोपीने पाठवला. मात्र अचानक २५ ऑगस्ट रोजी तांत्रिक कारणाने बुकिंग कॅन्सल झाल्याचे त्यांना कळवले तसेच पैसे परत देऊ असेही आश्वासन दिले. ऐनवेळी तक्रारदाराने लोणावळ्याच्या दुसऱ्या बंगल्यात वाढदिवस साजरा केला आणि तिथून परतत असताना आधी बुकिंग केलेल्या बंगल्यात चौकशीसाठी गेल्या. तेव्हा सदर बंगल्याचे कोणतेही इंस्टाग्राम पेज नसल्याचे त्यांना समजले. त्यानुसार फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली.