मुंबई - बोरिवली पूर्व येथील दौलत नगरमध्ये असलेल्या ओयेसिस इमारतीमधील दोन सुरक्षारक्षकांनीच एका सराफाच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांनी व्यवसायाने सराफ असलेल्या शाह कुटुंबीय लोणावळा येथे पिकनिकला गेल्यानंतर पळत ठेवून घरातून ४५ लाख रुपयांची रक्कम आणि सुमारे सहा लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. या दोघांना पकडण्यासाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तपास सुरु असलेला असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांनी सांगितले.
‘ओअॅसिस’ इमारतीत सहाव्या मजल्यावर राहाणाऱ्या अमित जयंतीलाल शाह यांचे घर इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी फोडले. १३ जुलैला शाह कुटुंब लोणावळा येथे पिकनिकला गेले होते. १४ जुलैला लोणावळ्याहून परतलेल्या शाह कुटुंबाला घराचे दार उघडताच धक्का बसला. पिकनिकला जातेवेळी एका सुरक्षारक्षकाने शाह कुटुंबाचे सामान सहाव्या मजल्यावरून खाली आणले आणि ते गाडीत ठेवण्यासाठी मदत केली होती. शाह कुटुंबाची गाडी इमारतीच्या आवारातून बाहेर पडताच सुरक्षारक्षकाने जोडीदारासह चोरीचा कट आखला. दोघांनी गच्चीतून शाह यांच्या घराच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. बेडरूमधील कपाट तोडले आणि दोघांच्या हाती ४५ लाखांची रोख रक्कम आणि ६ लाखांचे दागदागिने असे घबाड लागले.तसेच चोरट्या सुरक्ष रक्षकांनी स्वतःच्या बचावासाठी सीसीटीव्हीचे डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्ड) मशीन देखील चोरी केली आहे. ऐवज घेऊन दोघांनी मुंबई सोडल्याचा संशय पोलिसांना आहे. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांची विशेष पथके दोघांच्या मागावर असल्याची माहिती पिंपळे यांनी दिली. दोन्ही फरार सुरक्षारक्षक नेपाळचे रहिवासी असून काही वर्षांपासून या इमारतीत काम करत होते.