लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार झालेल्या नीरव मोदीला ब्रिटनमध्ये मार्च महिन्यात अटक करण्य़ात आली होती. आज त्याच्या जामीन अर्जावर तेथील न्यायालयाने सुनावणी घेतली. यावेळी त्याचा जामीन तिसऱ्या वेळी नाकारण्यात आला आहे. याआधी २९ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत मोदीचा जामीन नामंजूर करण्यात आला होता. पुढील सुनावणी आता २४ मे रोजी होणार आहे. नीरव मोदीला जामीन दिल्यानंतर तो पुन्हा सरेंडर होईल की नाही ही भीती असल्याने सहजासहजी जामीन मिळणं अवघड आहे.
नीरव मोदी विरोधात ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून नीरव तुरुंगात होता. न्यायालयात भारताकडून टोबी कॅडमन प्रतिनिधीत्व करत आहेत. तर दुसरीकडे ईडीने सहाय्यक संचालक सत्यव्रत कुमार याच्या बदलीचा आदेश शुक्रवारी काढला. कुमार हे नीरव आणि मल्ल्या यांच्या तपासावर निरिक्षक होते. कॅडमन यांनी नीरव मोदीचा जामिन नाकारण्यासाठी तो जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करेल आणि साक्षीदारांनाही धमकावेल, असा आरोप मागील सुनावणीदरम्यान केला होता. तसेच तो भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचे म्हटले आहे.