मुंबई - मुंबईसह देशाला हादरून टाकणाऱ्या २६/११ च्या थरारक दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत आहे. समुद्रमार्गे दहा दहशतवादी मुंबईत घुसले आणि त्यांनी मुंबईला लक्ष्य करत अनेक निष्पापांचे प्राण घेतले. या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समुद्र सुरक्षेसाठी २००९ मध्ये १५ सी लेक बोटी न्यूझीलंडहून मागवल्या होत्या. या बोटींना आता ९ वर्ष पूर्ण झाली. त्याचबरोबर या उपलब्ध बोटींबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी नव्या हायस्पीड आणि अत्याधुनिक बोटींची मागणी राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकार लवकरच या बोटी मुंबईच्या समुद्रात गस्तीसाठी दाखल करणार आहे. या नव्या अत्याधुनिक ('इमिजिएट सपोर्ट व्हेईकल') बोटी 'राॅयल इन्स्टिट्यूशन आॅफ नेव्हल आर्किटेक्ट' या कंपनीकडून येणार आहे. लंडन बनावटीच्या या बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे. या बोटींद्वारे २०० नाॅटीकल माईल खोल समुद्रात गस्त घालणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ताशी २५ किलोमीटर वेगाने ही बोट धावणार असून या बोटीतून एकाच वेळी ३४ जण प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे समुद्रात सात दिवस ही बोट थांबू शकते. सध्या ही बोट ओएनजीसी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. ओएनजीसीने ही बोट पाच वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतली असून त्याचे दिवसाचे भाडे १ लाख ७० हजार इतके आहे. या बोटी लवकरच राज्य पोलीस दलात दाखल होणार असून त्यामुळे समुद्री सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
२६/११ मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतरही गेल्या नऊ वर्षांमध्ये सागरी सुरक्षेत फारशी अशी प्रगती झालेली नाही. मुंबईसह राज्याला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. मात्र, या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केवळ २१ सागरी पोलीस ठाणे आहेत. ५ पोलीस ठाणी मुंबईत तर ५ ठाणे ग्रामीण, ५ रायगड जिल्हा, ६ सिंधुदर्ग आणि ५ रत्नागिरी जिल्ह्यात तर ३६ कोस्टल चौक्या, २२ नौका आणि ७ स्पीड बोटी आहेत. मात्र, सागरी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या बहुतांश साधनंही जुनी आणि नादुरुस्तच आहेत. समुद्रमार्गे घुसून मुंबईवर केलेल्या २६/११ च्या हल्यानंतर २००९ साली मुंबई पोलीस दलात 'फास्ट पेट्रोलिंग सर्व्हिस'करिता १५ स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. या बोटींद्वारे पोलीस हे समुद्रात गस्त घालत होते. मात्र, काही दिवसांनी या बोटींची क्षमता कमी असल्यामुळे गस्त घालण्यात अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. या बोटी ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने पाण्यात जरी धावू शकत असल्या तरी ५ नाॅटीकल अंतरापेक्षा त्या खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या. उथळ समुद्रात या बोटी पाण्यात थांबू शकत नाहीत. तसेच ४ ते ५ तासाहून अधिक वेळ त्या पाण्यात थांबू शकत नव्हत्या. त्यातच १६ पेक्षा जास्त मनुष्यबळ त्या वाहून नेऊ शकत नव्हत्या. या बाबींचा विचार करून सागरी सुरक्षा अधिक प्रभावी बनवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली होती.