लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ईडी अधिकारी असल्याचे सांगून ५९ कोटी उकळल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधात गुन्हा नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे. तो परदेशात पळून गेल्याच्या शक्यतेतून त्याच्या विरोधात एसीबीने लूक आउट नोटीस जारी केली आहे. नवलानीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानुसार, केंद्रीय यंत्रणा ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवत आहे. त्यात नवलानीसह ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी अरविंद भोसले यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. त्यापाठोपाठ एसीबीकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून २०१५ ते २०२१ या कालावधीत नवलानीने ५८ कोटी ९६ लाख ४६ हजार १०८ रुपये एवढी रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या रक्कमा नवलानी याने स्वतःच्या नावाने तसेच बनावट शेल कंपन्यांच्या नावाने असुरक्षित कर्ज व सल्लागार शुल्क या स्वरूपात घेतली होती. या रकमा नवलानीने ईडी अधिकाऱ्याला त्यांचे कर्तव्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अथवा तसे भासवून स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यामुळे बजावली नोटीसअखेर याप्रकरणी नवालानी व इतर विविध कंपन्यांसह ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच गुह्यांत नवलानी पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. यापूर्वी त्याला समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नसल्याचे एसीबीने सांगितले. तो फरार झाल्याच्या शक्यतेतून त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केल्याचे एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.