लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा) : पोलिसांना नांदा शिवारात बेवारस स्थितीत एक कंटेनर आढळून आला. प्रत्यक्ष पाहणीत त्याचे ‘लॉक’ तुटले असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्या कंटेनरमध्ये सिगारेट पाकिटे वाहून नेली जात होती. परंतु, आत काहीही नव्हते. त्यामुळे आतील सिगारेट पाकिटे लुटल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी यावर संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सीजी-०४/एमटी-५२३१ क्रमांकाचा कंटेनर नांदा शिवारात उभा असून, वाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांना कंटेनरजवळ ट्रान्सपोर्ट कंपनीचे शकील खान व इन्शुरन्स कंपनीचे नीलेश काळबांडे भेटले. त्यात भोपाळ (मध्य प्रदेश) येथून सिगारेटची पाकिटे घेऊन रायपूर(छत्तीसगड)ला जात असून, त्यांची एकूण किंमत ५ कोटी ३० लाख रुपये असल्याचे त्या दोघांनी पोलिसांना सांगितले.कंटेनरचे ‘लॉक’ तुटले असल्याचे पोलिसांना आढळून आले. ‘जीपीएस’ लोकेशनवरून हा कंटेनर तीन तासांपासून एकाच ठिकाणी उभा असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती कंटेनरमालक गोपीनाथ यांनी पोलिसांना दिली. तिथे चालक व क्लिनर नसल्याने विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी पाठविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याच सूचनेवरून पोलिसांनी हा कंटेनर ताब्यात घेतला होता.दरम्यान, कंटेनरचालक सईद खान अब्दुल खान हमीद (६२, रा. भोपाळ, मध्य प्रदेश) व क्लिनर रामसिंग यांनी बुधवारी दुपारी खापरखेडा पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना माहिती दिली. या घटनेबाबत संशय असल्याने खापरखेडा पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची नोंद केली नसून, सदर प्रकरण तपासात घेतले आहे.कोथुर्णा शिवारात काढली रात्रकंटेनर दहेगाव (रंगारी) येथील उड्डाण पुलावरून नागपूरच्या दिशेने जात असताना अज्ञात लोकांनी कंटेनरला बोलेरो आडवी केली. या कंटेनरने अपघात केल्याचे सांगून त्यांनी कंटेनर ताब्यात घेतला व डोळ्यावर पट्टी बांधून बोलेरोत बसविले. खापा - पारशिवनी मार्गावरील कोथुर्णा शिवारातील झाडाला बांधून ठेवत त्यांनी पळ काढला. स्वत:ची सुटका करवून घेतल्यानंतर त्याच शिवारात रात्र काढली व सकाळी पोलीस ठाणे गाठले, अशी माहिती कंटेनरचालक सईद खान अब्दुल खान हमीद यांनी पोलिसांना दिली.प्रकरण बनावट असल्याचा संशयपोलिसांनी कंटेनरच्या प्रवासाच्या मार्गवरील सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले. हा कंटेनर मध्यरात्री २.१४ वाजता पाटणसावंगी टोल नाक्यावर पोहोचला होता. त्यानंतर १५ मिनिटांनी तो ‘हायजॅक’ केला. अवघ्या तीन तासात कंटेनरमधील सिगारेट पाकिटे काढून त्यांची विल्हेवाट लावणे संशयास्पद आहे. विचारपूस केलेल्या दोघांच्या बयाणांमध्ये तफावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस दहेगाव (रंगारी) पासून नांदा व पिपळा (डाकबंगला) पर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासत आहेत.