पणजी - गोव्यात एटीएम चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून याच वर्षात एकूण १३ एटीएमस्कीमींगचे प्रकार आढळून आले आहेत. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करून लूटण्याच्या या प्रकारातून आतापर्यंत लाखो रुपयांची लूट या चोरट्यांनी केली आहे. गोव्यात एटीएममध्ये जात असाल तर त्या एटीएमला स्कीमर लावलेला नाही याची खात्री करूनच व्यवहार करावेत अशी सूचना पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी केली आहे. बुधवारी पणजी मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एटीएमला चोरट्यांकडून स्कीमर लावण्याचे याच वर्षात १३ प्रकार घडल्याची माहिती दिली. त्यातील ८ स्कीमर जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले तर ५ स्कीमरचा पत्ता पोलीस लावू शकले नाहीत. या पाच स्कीमरमधील माहिती चोरून चरट्यांनी सुमारे २० लाख रुपयांची लूट केली आहे. अनेकांची खाती साफ केली आहेत. खुद्द पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्याच एका बँकेच्या एटीएमला स्कीमर बसवून पोलीसांचीच खाती साफ करण्याचे धाडसही या चोरट्यांनी केले आहे.
पर्यटकांकडूनच पर्यटकांना लक्ष्य
गोव्यात देशी व अंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. हे पर्यटक ज्या एटीएमचा वापर जास्ती करण्याची शक्यता असते त्याच एटीएमला स्कीमर बसविण्याककडे या चोरट्यांचा कल असतो. कारण पर्यटक हे या ठिकाणी काही दिवसांचे पाहुणे असल्यामुळे येथील पोलीस स्थानकात जाऊन तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे येत नाहीत. तसेच तक्रार नोंदवली तरी एकदा आपल्या गावी परत गेल्यावर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ते पुन्हा येत नसतात. त्यामुळे अशाच लोकांना लक्ष्य बनविले जाते अशी माहिती सायबर विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. तसे करताना स्थानिकांनाही त्याचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे एटीएम चोरटेही पर्यटक म्हणूनच आलेले असतात. आतापर्यंत पकडलेले सर्व संशयित हे पर्यटकच ठरले आहेत. त्यातील दोघे हे विदेशी पर्यटक आहेत.
स्कीमिंग व खबरदारी
एटीएमला लावण्यात येणारे स्कीमर हे एटीएम कार्ड ज्या ठिकाणी स्क्रॅश केले जाते त्यालाच जोडले जाते. त्यामुळे स्क्रॅचरच्या आकारात गडबड दिसून आल्यास ते ओढून पाहण्याची खबरदारी लोकांनी घ्यावी अशी सूचना पोलिसांनी केली आहे. एटीएम क्रमांक पॅडच्यावर सूक्ष्म कॅमरा लावला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रमांक पॅड हाताने लपवून पीन कोड एन्टर करावा अशी सूचना करण्यात आली आहे. एटीएममध्ये स्कीमर लावलेले आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना दिल्यास एक हजार रुपये बक्षीस देण्याचे तसेच गुन्हेगाराला पकडल्यास ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी केली आहे.