मुंबई - तोतया पोलीस असल्याचे सांगून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसीटीव्हीच्या मदतीने गावदेवी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. दलिया उर्फ प्रदीप सुमस्ती (वय - ५१), अयुब खान (वय -४०), गणेश सोळंकी (वय - ४४) आणि राघवेंद्र (वय -४०) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पेडर रोड येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये तक्रारदार राहतात. मार्चमध्ये अनोळखी महिलेने त्यांना फोन करून अंधेरी स्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते आंबोलीला गेले. त्या ठिकाणी आणखी एक महिला आधीच हजर होती. त्यांनी तक्रारदाराला दारू पाजली. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच तेथे आणखी एक तरुणी आली. अर्धा तासानंतर तेथे तोतया पोलिसांमार्फत छापा टाकण्यात आला. कारवाई टाळायची असेल, तर 10 लाख द्यावे लागतील, असे या तोतया पोलिसांनी सांगितले. हा सर्व बनाव खरा मानून तक्रारदाराने त्यांना पाच लाख देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर बाबूलनाथ येथील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतील खात्यातून पाच लाख रुपये तोतया पोलिसांना दिले आणि सुटका केली.
मे मध्येही तक्रारदाराला एका महिलेने फोन करून वाढदिवसानिमित्त दहिसर येथे बोलावून घेतले. तेथेही अंधेरीत छापा घालणारा पोलिस आला. येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप करून तक्रारदाराकडे 15 लाख मागितले. त्याने या वेळीही पाच लाख त्यांना दिले. 11 जूनला तोतया पोलिसांपैकी एक जण तक्रारदाराच्या घरी आला आणि पैसे घेऊन गेला. अशाप्रकारे तोतया पोलिसाने लाखो रुपये उकळले. तक्रारदाराने हा प्रकार त्याच्या वकील मित्राला सांगितला. त्याने तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गावदेवी पोलिसांनी बँकेच्या सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.