कल्याण - लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसने काल रात्री कल्याणरेल्वे स्थानक सोडताच चार दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटल्याची घटना घडली. हे दरोडेखोर कसारा येथे एक्प्रेस थांबतच पळून गेले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आला असून या तक्रारीनुसार रेल्वे पोलीसांनी गुन्हा दखल करत एका संशयित इसमाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
काल रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एलटीटी गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस सुटली रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हि एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकातून सुटली. एक्स्प्रेस कल्याण शहाडदरम्यान धीमी होते. हीच संधी साधत चार दरोडेखोर एक्स्प्रेसमधील जनरल डब्यात घुसले. त्यांनी काही वेळातच प्रवाशांना धमक्या देत चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली. कसारा रेल्वे स्थानक येईपर्यंत त्यांनी प्रवाशांकडून मोबाईल, दागिने आणि रोख रक्कम असा ४० हजारांचा मुद्देमाल हिसकवून घेतला. कसारा येथे गाडी थांबताच दरोडेखोर पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र, घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने पोलिसांनी पळून जाणऱ्या दरोडेखोरांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस स्थानकात मालिकराम गुप्ता या प्रवाशाने तक्रार नोंदवली आहे. कल्याण रेल्वे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु असून या दरोडेखोरांचा तपास सुरु असल्याचे सांगितले.