प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: शहरातील एका धान्य व्यापाऱ्याची दोन लाख ६१ हजारांची रोकडने भरलेली हरविलेली बॅग अवघ्या तासाभरात शोधून काढण्यात टिळकनगर पोलिसांना यश आले आहे.
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी भागात राहणारे परेश मालोद हे व्यवसायाने धान्य व्यापारी आहेत. धान्याच्या व्यवहारातील दोन लाख ६१ हजार ५०० अशी रोकड असलेली बॅग घेऊन ते डोंबिवलीहून कल्याणला जात होते. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर ९० फिट रोडने दुचाकीवरून ते जात असताना त्यांची रोकड असलेली बॅग वाटेत कुठेतरी पडून गहाळ झाली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली पण बॅग कुठेही आढळुन न आल्याने अखेर मालोद यांनी टिळकनगर पोलिस ठाणे गाठले आणि बॅग हरविल्याची तक्रार दिली.
दरम्यान तक्रार दाखल होताच वरीष्ठ पोलिस निरक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब कोबरणे पाटील आणि अजमुद्दीन शेख तसेच पोलिस शिपाई दिलीप कनोजे यांनी तातडीने कल्याण पूर्वेतील पत्रीपूल, ठाकुर्लीतील रेल्वे समांतर आणि ९० फिट रोड, डोंबिवलीतील खंबाळपाडा रोड पिंजून काढला. अखेर हरवलेली बॅग ९० फिट रोडला एका ठिकाणी संपूर्ण रकमेसह आढळुन आली. तब्बल अडीच लाखांची रोकड असलेली बॅग सापडताच मालोद यांचा जीव भांडयात पडला. त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्याच्या संबंधित पोलिस अधिका-यांचे विशेष आभार मानले.