भोपाळ : ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गमावलेल्या तरुणाने बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्याच्याच अंगलट आला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका तरुणाने बँक लुटण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी तरुणाने बँक कर्मचाऱ्यांवर मिरचीचा स्प्रे फवारून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, यावेळी लोक त्याला पकडतील हे लक्षात येताच तो पळून गेला.
या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्याला अवघ्या २ तासांत पकडले. यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की, ऑनलाइन गेमिंगमध्ये बरेच पैसे गमावले आहेत, त्यामुळे त्याने बँक लुटण्याचा कट रचला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पिपलानी परिसरातील धनलक्ष्मी बँकेशी संबंधित आहे. शुक्रवारी दुपारी हा तरुण मास्क घालून बँकेत आला. त्याने सुरुवातीला बँकेत अकाउंट ओपन करायचे आहे, असे सांगितले.
अकाउंट ओपन करण्यासाठी त्याला पत्ता विचारला असता त्याने रेंट अॅग्रीमेंट दिले. त्यावर बँक कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले की, रेंट अॅग्रीमेटंद्वारे बँकेत अकाउंट ओपन करता येत नाही. याशिवाय, बँक कर्मचाऱ्यांनी त्याला चेहऱ्यावरील मास्क काढण्यास सांगितले. मास्क काढल्यानंतर तो तरुण काही वेळ तिथेच थांबला आणि नंतर निघून गेला.
दुपारी चार वाजता तरुण पुन्हा बँकेत पोहोचला आणि त्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांवर मिरचीचा स्प्रे फवारण्यास सुरुवात केली. स्प्रे फवारणारा तरुण कॅश काउंटरच्या दिशेने जात होता, त्याचवेळी बँकेच्या ४-५ कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गेटबाहेर पळून गेला.
या घटनेनंतर बँक मॅनेजरने तात्काळ पिपलाणी पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तरुणाच्या पलायनाचा मार्ग शोधून काढला आणि दोन तासांच्या आत त्याला पकडले. हा तरुण भोपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी चौकशी केली असता तरुणाला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले होते. यामध्ये त्याने जवळपास २ लाख रुपये गमावले आहेत. कॉलेजची फी भरण्याव्यतिरिक्त त्याने मित्रांकडून पैसे उसने घेतले आणि ऑनलाइन गेम खेळून पैसे गमावले होते. यानंतर त्याने बँक लुटण्याचा कट रचला. चौकशीत त्याने अनेक बँकांची रेकी केल्याचे समोर आले. तसेच, पोलिसांनी आरोपीकडून त्याची दुचाकी आणि मिरचीचा स्प्रे जप्त केला आहे.