हरयाणामधील गोहाना येथे बुलेटमध्ये बदल करुन मोठा आवाज काढणं अनेकांना चांगल महागात पडताना दिसत आहे. पोलिसांनी बुलेट बाईक मॉडिफाय करुन तिचा फटाक्यांप्रमाणे मोठा आवाज काढत फिरवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. गोहाना-जिंद मार्गावरील मुलींच्या महाविद्यालयासमोर एका अशाच एका बुलेटस्वारावर पोलिसांनी कारवाई केली.
हा मुलगा आपल्या बुलेटवरुन मोठ्याने आवाज करत जात असतानाच मागून आलेल्या पोलिसांच्या जीपमधील हवालदारांनी या मुलाला थांबण्यास सांगून त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलत बुलेटसहीत त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी या तरुणाकडे गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र नव्हते. महत्वाचे म्हणजे गाडीवर नंबर प्लेटऐवजी ‘नम्बरदार’ असं लिहिण्यात आलं होतं. पोलिसांनी या सर्व प्रकरणांसाठी तब्बल ५६ हजार रुपयांचं चलान फाडले आणि त्याला झटका दिला. तसेच चलान भरत नाही तोपर्यंत गाडी पोलिसांच्याच ताब्यात पोलीस चौकीच्या आवारात ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मागील काही दिवसांपासून गोहाना पोलिसांनी बुलेट चालकांविरोधात मोहीम उभारली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या आवाजाच्या अनेक बुलेट चालकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. गोहानामध्ये मागील तीन दिवसांत सात ते आठ बाईक चालकांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक तरुण कागदपत्र, लायसन्स नसून तसेच इतर नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजाच्या गाड्या फिरवताना अनेकदा आढळुन आले आहे. त्यामुळेच पोलिसांनी राबलेल्या या मोहिमेअंतर्गत तीन दिवसांमध्ये तब्बल दोन लाख ३४ हजार रुपयांचा दंड बाईकस्वारांना ठोठावण्यात आला.
याबाबत न्यूज १८ ला अधिक माहिती देताना गोहाना शहराच्या पोलीस प्रमुख सवित कुमार यांनी महिलांच्या कॉलेजसमोर मोठ्या आवाजाच्या बुलेट बाईक घेऊन जाताना आम्ही बुलेटस्वारावर कारवाई केल्याचे सांगितले आहे. अनेकदा या मुलांकडे कोणतीही कागदपत्र नसल्याचे दिसून येतं. नंबर प्लेट नसणे, बाईकचा मोठा आवाज, कागदपत्र नसणे या सर्व वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या एका बाईकस्वाराला ५६ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती कुमार यांनी पुढे दिली. मोठ्या आवाजातील बाईक्समुळे अनेक वेळा पादचाऱ्यांना त्रास होतो. तसेच या आवाजामुळे वयस्कर व्यक्तींना देखील डोकेदुखी होतो.