मुंबई/आष्टी (जि. बीड) : डिप्लोमा करून इंजिनिअर बनला, नंतर प्राध्यापक झाला, मग दूध डेअरीचा चेअरमन झाला. यातच तो तरूण एका मुलीच्या प्रेमात पडला. मात्र, तिने आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने हा मनोरुग्ण झाला. तेव्हापासून तो आपल्या प्रेयसीवर अत्याचार झाला असून आरोपींना अटक करावी, अशी मागणी करत भटकत आहे. गुरूवारी याच तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील बापू नारायण मोकाशे (४४) असे या तरुणाचे नाव आहे. मुंजाबा वस्तीवर बापू हा एकटा राहतो. बारावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा केला. पुण्यात अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून टाकळी ढाेकेश्वर आणि जामखेड येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. दूध डेअरीचा चेअरमनही झाला. याच दरम्यान त्याचा एका मुलीवर जीव जडला. दोघेही नगरमध्ये राहत होते. परंतु, त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली. त्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. प्रेयसीवर अत्याचार झाला, आरोपींना अटक करा अशी मागणी तो करत असतो. परंतु गावातील लाेकांना सर्व कहाणी माहिती असल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.
माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली पण... बापूने उडी मारली पण सुरक्षा जाळीमुळे तो बचावला. त्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला. माझ्या प्रेयसीवर बलात्कार झाला. तिने आत्महत्या केली. याबाबत माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली. मात्र, कोणीही दखल घेतली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. चार दिवसांपासून गायबबापू मागील चार दिवसांपासून गायब असल्याचे त्याच्या गावकऱ्यांनी सांगितले. कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याने काहीच सांगितले नव्हते. तो गावात एकटा फिरायचा, एकटाच बसायचा, प्रेमभंग झाल्याचे बोलून दाखवायचा.