अमरावती : तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण रजिस्टर लग्न करू, अशी बतावणी करत एका तरूणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पुढे तिचा जबरीने गर्भपात करण्यात आला. त्यानंतरही त्याने नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला. यानंतर अखेरिस त्या तरूणीने पोलीस ठाणे गाठले. शारीरिक व मानसिक छळाची ती मालिका येथील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत घडली. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी संदीप उर्फ राहुल सिताराम फुसलकर (२५, रा. वडरपुरा) याच्याविरूध्द शनिवारी रात्री अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आसाम गुवाहटी येथील एका तरूणीची अमरावतीतील नितीन नामक तरूणाशी फेसबुकवर ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून तो तिला गुवाहटीवरून अमरावतीत घेऊन आला. नोव्हेंबर २०२० पर्यंत ते सोबत राहिले. मात्र पुढे त्यांच्यात खटके उडू लागल्याने ती ५ नोव्हेंबर २०२० रोजी गुवाहाटीला परतली. त्या दोघांमधील संबंध तेव्हाच संपुष्टात आले. दरम्यान, जानेवारी २०२१ मध्ये ती अमरावतीत परतली. ओळखीच्या संदीप फुसलकरने तिला भाडयाची खोली करवून दिली. तिला तिच्या खासगी नोकरीच्या ठिकाणी संदीपच आणून नेऊन घालायचा. काही दिवसांनी संदीपने तिला प्रपोझ केले. तथा तुझ्याशी लग्न करायचे आहे, तुला घरी न्यायचे आहे, अशी बतावणी करून त्याने तिच्यावर अनेकदा शारीरिक बळजबरी केली. पुुढे अनेकदा त्याने खोटे बोलून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
अवैध गर्भपातासाठी दिल्या गोळ्या -१७ जानेवारी रोजी आरोपी संदीप हा पिडिताच्या खोलीवर आला असता, आपण दिड महिन्यांची गर्भवती असल्याची बाब तिने त्याला सांगितली. त्यामुळे आपल्याला नोंदणी विवाह करावा लागेल, असे म्हणताच त्याने ती बाब टोलविली. दोन तीन दिवसा तिच्याशी प्रेमाने राहिला. तिसऱ्या दिवशी त्याने तिला गर्भपाताचा सल्ला देत विवाहाची खात्री दिली. मात्र तिने नकार दिला असता तिला त्याने भुलथापा देऊन गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी तिचा गर्भपात झाला.
घरातून दिले हाकलून -गर्भपाताचे कळविल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी त्याने पुन्हा एकदा तिची खोली गाठून तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर तो नॉट रिचेबल झाल्याने पिडिताने त्याचे घर गाठले. तेथे त्याच्या आईला संपुर्ण आपबिती सांगितली. मात्र तेथून तिला शिविगाळ करून हाकलून देण्यात आले. जबरीने गर्भपात केल्यानंतरही आरोपीने आपल्याशी लग्न केले नाही, आपली फसवणूक झाल्याचे अखेरीस लक्षात आल्याने तिने २५ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे गाठले.