बारामती : बारामती शहरात रविवारी (दि 14) भर दिवसा फलटण रस्त्यावरील गॅरेज मालकाच्या घरात घुसून सासू सुनेच्या गळ्याला चाकू लावत लूट करण्यात आली होती. या घटनेत दागिने आणि साडे सहा लाखांच्या रोख रकमेसह आठ लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा शोध घेतला आहे. या घटनेत फिर्यादी महिलेनेच बनाव रचत एका चायनीज गाडा चालविणाऱ्या युवकाच्या मदतीने हा प्रकार घडवून आणल्याचे उघड झाले आहे. (fake Robbery in Baramati exposed by police)
काल दुपारी हा प्रकार घडला. भर दिवसा घडलेला प्रकार असल्याने पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी गांभीर्याने घेत तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांच्या तत्परतेने ही घटना आता उघड झाली आहे. पोलिस निरिक्षक शिंदे यांनी फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून तातडीने चोरट्यांचा तपास सुरु केला.प्राथमिक चौकशीत पोलिसांना काही बाबी खटकल्या. या प्रकरणाच्या मुळाशी जात त्यांनी तपास सुरु केला. यात सत्य समोर आल्यानंतर मात्र पोलीस देखील आश्चर्यचकित झाले. फिर्यादी महिलेनेच पैशाची अडचण दूर करण्यासाठी रोकड व दागिने लुटीचा हा सगळा बनाव रचल्याचे समोर आले. यामध्ये चायनीज विक्री करणाऱ्या एका युवकाची मदत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी फिर्यादीच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स तपासले. यावेळी एका विशिष्ट क्रमांकावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर त्या नीरा वागज येथील तीस वर्षीय चायनीज गाडा चालविणाऱ्या लखन गोपाळ भोसले (वय 30,रा. निरा वागज, ता. बारामती) या युवकापर्यंत पोलीस पोहचले. पोलिसी खाक्या दाखवताच माहिती समोर आली. त्याच्याकडेच लूट केलेली रोख रक्कम व दागिने सापडले आहेत. खोटी फिर्याद देत रचलेल्या बनावामुळे पोलिसांची दमछाक झाली. संबंधित महिलेविरुध्द न्यायालयात ही बाब मांडणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. मदत घेतलेला माणूस फिर्यादीचा प्रियकर आहे. त्यातुन हा प्रकार झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.