बिहारमध्ये एका एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणाने जे केले ते पाहून पोलिस अधिकारीदेखील हादरले आहेत. या घटनेत कोणाला साधी दुखापतही झाली नाही, परंतू या तरुणाने तरुणीच्या आई वडिलांसोबत त्यांना सोडविण्यासाठी चर्चेसाठी गेलेल्या पोलीस इन्स्पेक्टरलाही ओलीस ठेवले होते.
बेतियातील महेंद्र कॉलनीमध्ये राहणाऱ्या अरूण कुमार यांच्या घरात सतीश या तरुणाने सहा तास गोंधळ घातला होता. पिस्तुलच्या धाकावर त्याने कुमार यांच्या घरातील सहा लोकांना वेठीस धरले होते. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने पिस्तुलमधील गोळ्यांवर तरुणीच्या आई-वडिलांचे आणि स्वत:चे नाव लिहिले होते.
या लोकांना वाचविण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही या तरुणाने ओलीस ठेवले. हा तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सकाळी सात वाजता घरात घुसला होता. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या तरुणाच्या तावडीतून घरातील लोकांना सोडविण्यास गेले होते. कसेबसे एक पोलीस इन्स्पेक्टर घरात पोहोचले परंतू त्यांनाही या तरुणाने बंदी बनविले. कसेबसे ते सतीशच्या तावडीतून सुटले आणि बाहेर पडले. इन्स्पेक्टरला बंदी बनविल्याचे समजताच वरिष्ठ अधिकारी तिथे आले होते. त्यांनी घराला वेढा घातला.
पोलिसांनी सतीशला काय हवेय असे विचारले, त्यावर त्याने आपला खासगी विषय आहे, पोलिसांनी जावे असे सांगत गोळी मारण्याची धमकी दिली. घरात आणखी एक पोलीस जवान अडकला होता. त्याने सतीशला इकडे तिकडे गुंतवण्यास सुरुवात केली. सतीशला चमचा घेण्यात गुंतवताच पोलिसांनी दरवाजा तोडला आणि सतीशवर हल्ला करत त्याला ताब्यात घेतले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सतीशकडून पिस्तूल आणि पाच काडतूस जप्त करण्यात आले. यावर त्याने स्व:ताचे आणि तरुणीच्या कुटुबीयांचे नाव लिहिले होते. सतीशला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.