बरेली: उत्तर प्रदेशातील एका तरुणानं प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर आरोपी प्रियकर एसएसपी कार्यालयात पोहोचला. त्यानं स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली. त्यानं हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतलं.
प्रेयसीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्रेयसीनं मला शेत विकायला लावलं. त्यातून दागिने तयार केले. माझ्याकडून पैसेदेखील घेतले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला, अशी माहिती प्रियकरानं पोलिसांना दिली. तुला बघून घेईन अशी धमकी प्रेयसी वारंवार द्यायची. अपशब्द वापरायची. त्यामुळे तिला संपवलं, असं प्रियकरानं सांगितलं.
बरेलीतील फतेहगंजमधल्या डगरोलीमध्ये ही घटना घडली. प्रेयसीची हत्या करून आरोपी एसएसपी कार्यालयात पोहोचला. त्यानं पिस्तुल पोलिसांच्या स्वाधीन केलं. 'मी रजनेश सागर, माझ्या प्रेयसीचा खून करून आलोय,' अशी कबुली त्यानं पोलिसांना दिली. यानंतर पोलीस ठाण्यात खळबळ माजली.
'मला आई-वडील नाहीत. माझ्या प्रेयसीनं विश्वासघात केला. माझ्या मालकीची जमीन होती. रिक्षा होती. तिनं ती विकायला लावली. स्वत:साठी दागिने केले. माझ्याकडून ३५ हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला,' अशी माहिती रजनेशनं पोलिसांना दिली.
रजनेशची प्रेयसी सोमवारी दुपारी तिच्या मावसभावासोबत बाजारात गेली होती. बाजारातून घरी परतत असताना रजनेशनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर प्रेयसी आणि तिचा भाऊ खाली पडला. रजनेशनं प्रेयसीकडे लग्नाचा विषय काढला. तिनं स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर रजनेशनं तिचे केस धरून तिला फरफटत नेलं. त्यानंतरही प्रेयसी ऐकत नसल्यानं रजनेशनं तिच्यावर गोळीबार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.