मुंबई - गोवंडीत एक चित्तथरारक घटना घडली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून देखील एका दीड वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. विशेषत: एवढ्या उंचावरून पडून त्याला साधे खरचटले देखील नसल्याने गोवंडीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अथर्व बारकडे असं या नशीबवान चिमुकल्याचं नाव आहे.
व्यावसायिक अजित बारकडे हे एकत्र कुटुंबात गोवंडी येथील जय गोपी कृष्णा सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील सी-४०१ मध्ये राहण्यास आहे. अथर्व हा अजित आणि मंगल बारकडे यांचा मुलगा असून लग्नाच्या 5 वर्षानंतर झालेले अथर्व हे एकुलतं एक अपत्य आहे. गुरुवारी सकाळी घरातील सर्वजण कामावर जाण्याच्या गडबडीत असताना अथर्वच्या आजीने वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी खिडकी उघडली. कपडे काढून झाल्यानंतर त्या खिडकीचे दार बंद करण्यास विसरल्या. त्यावेळी अथर्व हॉलमध्ये खेळत खेळत खिडकीजवळ गेला आणि तोल जाऊन खिडकीतून खाली पडला. सुदैवाने इमारतीच्या खाली असलेल्या अशोकाच्या झाडामुळे अथर्वला खरचटले देखील नाही. अथर्व पडल्याचे लक्षात येताच घरातील सगळ्यांनी खाली धाव घेतली. त्यावेळी अथर्व उभा राहून रडत असल्याचे त्यांना दिसले. आई मंगलने त्याला कुशीत घेऊन जवळच्या हॉस्पिटलात नेले. मात्र त्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नसल्यामुळे डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. अथर्व सुखरूप होता. मात्र घाबरल्यामुळे त्याला डॉक्टरांनी दाखल करून घेतले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.