नवी दिल्ली - कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे,. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असताना स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल लावलं जात असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये तब्बल 700 जणांची फसवणूक करण्यात आली असून अनेकांचा जीव धोक्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना आतापर्यंत अटक केली आहे. एका स्वस्त इंजेक्शनवर हे रेमडेसिवीर इंजेक्शनचं खोटं लेबल लावत आणि ते तब्बल 15 ते 20 हजारांना विकत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अधिक तपासादरम्यान आरोपींनी 98 रुपयांच्या PPT 4.5 GM इंजेक्शनवर रेमडेसिवीरचं लेबल लाऊन 700 पेक्षा जास्त लोकांना ते विकून त्यांची फसवणूक केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत जवळपास 4800 रुपये इतकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा वेळी आरोपी ते इंजेक्शन ज्यांना गरज आहे त्यांना 15 ते 20 हजारांना विकत आहेत. यामध्ये दुसऱ्या इंजेक्शनला लेबल लावून ते हजारो रुपयांना विकून अनेकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे. आरोपींकडून इंजेक्शनच्या 59 बाटल्या, PPT 4.5 GM चे 240 पॅकेट इंजेक्शन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचे 4,224 लेबल तसेच 85,840 रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एका रुग्णालयात नर्स उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना भलतंच नॉर्मल इंजेक्शन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत असल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर ती आपल्या प्रियकराला याचा पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकत होती. मध्य प्रदेशमध्ये ही घटना आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, प्रेमासाठी रुग्णांच्या जीवाशी असा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी भोपाळ पोलिसांनी जेव्हा एका तरुणाला ताब्यात घेतलं तेव्हा हे सत्य समोर आलं आहे.