लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे १६ वर्षीय मुलाने स्वत:च्या आईलाच मारून टाकलं. पबजी खेळण्यावरून झालेल्या वादातून मुलाने हे घातक पाऊल उचललं. मुलाचे वडील लष्करात आहेत. या घटनेने हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. काहीतरी वाईट घडणार असल्याची जाणीव आधीच झाली होती असं विधान मुलाच्या वडिलाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.
वडिलांनी सांगितले की, मुलाचा स्वभावात बदल झालेला दिसून आला. तो काही योग्य वागत नव्हता. तो कुठल्याही वेळी आईला मारू शकतो याची जाणीव झालेली. यासाठी मी लखनौला येणार होतो. परंतु सुट्टी न मिळाल्याने जाऊ शकलो नाही. घरात विजेचे बिल आले होते त्यात कनेक्शन कट करण्याची नोटीस होती. त्यामुळे पत्नी खूप चिंतेत होती. ४ तारखेला माझं तिच्याशी बोलणं झाले. तेव्हा मुलगा दिवसभर मोबाईलमध्ये असतो, ओरडलं तरी ऐकत नाही. एकेदिवशी स्कुटी घेऊन जाताना विरोध केला त्यावरूनही मुलाने आईशी भांडण केल्याचं म्हटलं.
तसेच मुलाशी मी फोनवरून बोललो त्याला समजावले. आईशी भांडू नको. ती जसं सांगते तसं वाग. तो काहीही उत्तर देत नव्हता. एकेदिवशी त्याने रागात सांगितलं मी तिला मारून टाकेन मला खूप राग येतोय. रविवारी मी कॉल केला तेव्हा मुलाने उचलला तेव्हा आई बिल भरायला गेली का? असं मी विचारलं तेव्हा आई शेजारी गेलीय. तेव्हा बहिणीला फोन दे असं म्हटलं त्यानंतर त्याच्याशी काही संवाद झाला नाही असं वडिलांनी सांगितले.
दरम्यान, मला खूप भीती वाटत होती, अखेर काय झालं? काही अघटित घडलं नसेल ना, मुलाचा हेतू घातक होता. त्याने मी ट्यूशन टिचरला फोन केला घरी जाऊन पाहा काय झालंय का? ट्यूशन टिचर घरी पोहचली तेव्हा तिने घर बंद असल्याचं पाहिलं. स्कुटीही उभी नव्हती. कुत्रा नेहमी घरात असतो तो बाहेर बांधलेला होता. तेव्हा मला संशय आला. १-२ दिवस सुट्टी घेऊन घरी जाण्याचा विचार करत होतो परंतु शक्य झालं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि फोन करणार होतो इतक्यात अचानक माझ्या मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितले घरात मागच्या दाराने अचानक कुणी तरी आले त्यांनी आईला मारून टाकलं. तेव्हा माझा संताप अनावर झाला त्याला तूच आईला मारलं, जी भीती होती ती खरी ठरली. मुलानेच आईला मारून टाकलं असं वडिलांनी सांगितले.