मुंबई : लकी ड्राच्या नादात पवईतील ४२ वर्षीय चंद्रप्रकाश काळुराम जोशी यांना सव्वा लाख रुपयांचा फटका बसला आहे. पवई पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरुन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.जोशी हे पवईत खानावळ चालवतात. ते भीम अॅप वापरतात. त्याच अपला जोडून असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांना शॉपक्लुझ आॅनलाईन शॉपिंग कंपनीच्या नावे लकी ड्रॉ ओपन झाल्याचे सांगून दोन पर्याय देण्यात आले. त्यात, एकात कार तर दुसऱ्यात १४ लाख ६० हजार जिंकण्याची संधी देण्यात आली. नोंदणीसाठी त्यांना साडे सात हजार रुपये भरण्यास सांगितले. संपर्क क्रमांकावरुन मोलय शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत संपर्क साधला. त्यांनी अॅपवरुन त्यांना पैसे पाठवले. त्यानंतर त्याने कॉल करुन आणखीन दीड टक्के रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार, १९ जून रोजी आणखीन पैसे पाठवले. १४ लाख ६० हजार रुपये जिंकण्याच्या नादात २२ जून पर्यंत त्यांनी १ लाख १६ हजार रुपये जमा केले.
लकी ड्रॉच्या नादात गमावले सव्वा लाख, पवईत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 3:21 AM