जळगाव : राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांना साडे सहा लाख रुपयात गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दीपक बापू जाधव (रा. वासखेडी,ता. साक्री, जि.धुळे) याला शनी पेठ पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
वंदना अशोक मराठे उर्फ वंदना सचिन बुचडे (३१ रा.जोशी पेठ, जळगाव ह.मु.मुंबई) यांनी तसेच त्यांचे चुलत भाऊ वाल्मीक सुरेश पाटील यांनी दीपक जाधव याला २०१८ व २०१८ या दोन वर्षात ६ लाख ४० हजार १०० रुपये वेळोवेळी दिलेले आहेत. काही रक्कम बँक खात्यात तर काही रक्कम ऑनलाईन वर्ग केलेली आहे. राहुरी कृषी विद्यापीठात दोघांना लिपिक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष जाधव याने दिले होते, तीन वर्षात त्याने ना नोकरीला लावले ना पैसे परत केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंदना यांनी शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार जाधव यांच्याविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक कवडे, हवालदार रवींद्र संभाजी पाटील, किशोर पाटील व रवींद्र पाटील यांच्या पथकाने जाधव याला सोमवारी दुपारी अटक केली.