कल्याण: यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून कल्याणमधील एका 33 वर्षीय तरूणीला ऑनलाईनच्या माध्यमातून 16 लाख 45 हजार रूपयांचा गंडा घातला गेल्याची धककादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रकाश शर्मा नामक व्यक्तिविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणात फसवणूक झालेली तरुणी खडकपाडा परिसरात राहणारी असून नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठया पदावर कार्यरत आहे. या तरूणीने जीवनसाथी डॉट कॉम वर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. युकेमध्ये राहणा-या प्रकाश शर्माने तीच्याशी संपर्क साधला आणि लग्नासाठी तयार असल्याचे तीला सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींगच्या माध्यमातून चर्चा सुरू होती. जानेवारीमध्ये भारतात येणार असल्याचे प्रकाश याने तीला सांगितले. 23 जानेवारीला शर्मा याने फोन करून सांगितले की तो दिल्ली एअरपोर्टला आला आहे. मात्र त्याच्याजवळ सोने असल्याने त्याला कस्टम अधिका-यांनी पकडले आहे. यातून सुटण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगत त्याने तिच्याकडे प्रारंभी 65 हजार रूपयांची मागणी केली. संबंधित तरूणीने नेट बॅकिंगद्वारे प्रकाशला दिले. त्यानंतरही 24, 25 आणि 26 जानेवारीला काही न काही बतावणी करून शर्माने तिच्याकडून तब्बल 16 लाख 45 हजार रूपये घेतले आणि तो अचानक गायब झाला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरूणीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे गाठत शर्मा विरोधात तक्रार दाखल केली.
‘जीवनसाथी’वरून लग्नाचे आमिष, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 2:52 PM