लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लग्नाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश येथून मुंबईत विक्रीसाठी आणलेल्या तरुणीची सुटका करण्यात टिळक नगर पोलिसांना यश आले आहे. मुलीची विक्री होण्यापूर्वीच टिळक नगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथून ताब्यात घेत कारवाई केली आहे. अमन शर्मा आणि आंचल शर्मा असे अटक करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव आहे.
मूळची उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेच्या १८ वर्षीय तरुणीची अमन शर्मासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अमनने तरुणीचा विश्वास संपादन करीत तिला लग्नाचे आमिष दाखविले. पुढे, संबंधित मुलीला २० मे रोजी मुंबईतील रेड लाईट एरियामधील कुंटणखान्यात विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, टिळक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे सापळा रचला.
जोडप्याला अटक करीत तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. चौकशीत शर्मा यांचे लग्न झाले असतानाही त्याने तरुणीला अंधारात ठेवून लग्नासाठी मुंबईत आणले. त्याच्यासोबत त्याची पत्नीही गुन्ह्यात सक्रिय होती. दोघांना २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत टिळक नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.