नागपूर : वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली संपर्क करत सायबर गुन्हेगारांनी चक्क एका ‘आयटी डेव्हलपर’ तरुणीलाच ‘टार्गेट’ केले. तिला ‘ऑनलाईन टास्क’च्या नावाखाली गुंतवणूक केल्यास नफा होईल असे आमिष दाखवून ११.३२ लाखांचा गंडा घातला. मागील काही काळापासून नागपुरात असे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
निकीता प्रभाकर मेहकारकर (२६, ढोरे ले आऊट) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. २५ जून रोजी त्यांना ९११२०३१२७२८८ या क्रमांकावरून फोन आला व समोरील व्यक्तीने पार्ट टाईम जॉब असल्याचे सांगितले. समोरील व्यक्तीने निकीता यांना पैसे गुंतवून एक टास्क पूर्ण केल्यास आर्थिक नफा होईल असे सांगितले. निकीता यांनी तसे केले असता आरोपीने त्यांना नफ्यासह परतावा दिला. यामुळे त्यांचा आरोपीवर विश्वास बसला. त्यानंतर निकीता यांनी त्याच्या सांगण्यावरून एका अकाऊंटदेखील उघडले.
आरोपीने त्यांच्या बॅंकेचे तपशील घेऊन ५ जुलैपर्यंत त्यांना ११.३२ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र त्याने त्यातील एकही रुपया परत केला नाही. निकीता यांनी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यानंतर संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निकीता यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.