पिंपरी : व्यवसायात नुकसान झाल्याने दरोडेखोरांनी लुटलेले सोने लुबाडून पळून जाण्यासाठी दोघा जणांनी टेस्ट ड्राइव्ह च्या बहाण्याने आलिशान मोटार पळवून नेली. मात्र, निगडी पोलिसांनी केलेल्या तपासामुळे त्यांचा कट फसला. तळेगाव - दाभाडे येथून दोघांनाही जेरबंद करण्यात आले. दत्तात्रय आण्णा डुबे (वय ३१, रा. मोरेवस्ती, चिखली, मुळ - करमाळा, जि. सोलापूर) आणि दत्तात्रय पांडुरंग रंदवे (वय २८, सध्या रा. इंदोरी, ता. मावळ, मुळ - करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार यांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी मोटार विक्रीचा व्यवसाय करणारया उमेश चौधरी यांची १४ लाख रुपये किंमतीची आलिशान मोटार टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने २८ मार्च रोजी काळभोरनगर येथून पळवून नेली होती. चोरीला गेलेली ही मोटार घेऊन आरोपी तळेगाव - दाभाडे म्हाळसकरवाडी येथे पैसा फंड काच कारखान्यासमोर येणार असल्याची माहिती निगडी पोलीसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता व्यवसायात नुकसान झाले. पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे भिगवण, बारामती परिसरातील दरोडेखोरांनी लुटलेले दोन किलो सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हडप करायचे आणि मोटारीतून पसार व्हायचे, असा कट आखल्याची कबुली त्यांनी दिली. मोटार चोरल्यानंतर दोन दिवसांनी तिला बनावट नंबर प्लेट लावून डुबे आणि रंदवे हे मोटारीतून भिगवण येथे जाऊन आल्याचेही त्यांनी पोलीसांना सांगितले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सतिश पवार, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, उपनिरीक्षक संतोष घाडगे, कर्मचारी सतिश ढोले, किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, प्रवीण मुळुक, सोमनाथ दिवटे, विलास केकाण यांच्या पथकाने केली.
चोरीचे सोने लुबाडून पळून जाण्यासाठी चोरली अलिशान मोटार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 7:54 PM