Trending Story: एका आलिशान कारमधील दोन तरुणांनी चरायला सोडलेल्या दोन बकऱ्या चोरल्याची घटना घडली. बकरी चोरांचे हे कृत्य जवळच्या ढाब्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की चोरट्यांनी आधी बकरीला काही तरी खाऊ घातले आणि नंतर कारमध्ये ओढून नेले. डोळ्याची पापणी लवण्याआधीच हे लोक आलिशान कारमध्ये बकऱ्या भरून घेऊन पळून गेले. विशेष म्हणजे जवळच्या ढाब्यावर उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षातही आले नाही, इतक्या पटकन हे लोक पळून गेले.
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिनारा पोलीस ठाण्यांतर्गत ठाणरा चौकी परिसरातील आहे. येथील रहिवासी गोपाल यादव मुलगा रामजी लाल यादव यांच्या घराजवळ दीपू नावाचा ढाबा आहे. ढाब्याजवळून दोन बकऱ्या अचानक गायब झाल्या. ढाब्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. या दरम्यान एक धक्कादायक दृश्य समोर आले. एक आलिशान कार थांबली आणि त्यातून दोन तरुण खाली उतरले. प्रथम चोरट्यांनी बकऱ्यांना हरभरा आणि केळी खायला दिली. त्यानंतर बकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने कारमध्ये ओढण्यात आले. संधी पाहून बकऱ्या घेऊन ती कार पटकन नजरेआड झाली. दरम्यान, अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल झाली नाही. बकरी चोरीची तक्रार येताच पुढील कारवाई करण्यात येईल. पण चोरांनी अशाप्रकारचे कृत्य करण्यामागे काय हेतु असेल याचाच विचार गावकरी करत आहेत.
मध्य प्रदेशात बकरी चोरीची ही पहिलीच घटना नाही. याआधीही राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देवास शहराच्या हद्दीतील आमोणा आणि रसूलपूर येथेही बकऱ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी या प्रकरणी दोन चोरट्यांना अटकही केली होती. विशेष म्हणजे या दोन चोरट्यांकडून सुमारे ७ लाखांची स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली. या कारमधून दोन्ही चोरटे बकऱ्या चोरीच्या घटना घडवून आणायचे.